पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तांब्याचे बंब व लोखंडी साहित्य चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद, ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील विविध ठिकाणी तांब्याचे पाण्याचे बंब व बांधकामातील लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाचगणी पोलिसांनी अल्पावधीतच आरोपींना अटक करून सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पाचगणी पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार खिंगर (ता. महाबळेश्वर) दिनांक १८ ते १९ मार्च दरम्यान
येथील गणेश सुरेश जाधव तसेच दि. २९ ते ३० मार्च दरम्यान भौसे येथील योगेश शिवाजी गोळे यांच्या घरासमोरील तांब्याचे पाण्याचे बंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार ३ एप्रिल रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन पथके तयार करून अवघ्या २४ तासांत आरोपी संस्कार दत्तात्रय गायकवाड (रा. इंदवली, ता. जावळी) व सयाजी हिंदूराव मदने (रा. बोबडेवाडी, ता. खटाव) यांच्यासह अन्य संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
याचदरम्यान ४ एप्रिल रोजी रात्री गस्तीदरम्यान प्रमाळे गल्ली परिसरात बांधकामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी गंजलेले बेस चोरीप्रकरणी कन्हैयालाल सुगनू मौर्य (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या पाचगणी) यास स्कुटरसह अटक करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

