गोडवलीत श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात; पालखी, ढोल-ताशे व भक्तिरसात रंगला परिसर

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : गोडवली, (ता. महाबळेश्वर)  येथील नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोडवली गावात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्यांना ग्रामस्थ व परिसरातील स्वामी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रकटदिनाचे औचित्य साधून सकाळी श्रींना विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी सुमारे चार वाजता नरवीर तानाजी मालुसरे स्मारकापासून ढोल-ताशांच्या गजरात व “स्वामी समर्थ महाराज की जय” च्या घोषात पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भक्तांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

ही पालखी ग्रामदैवत श्री काळेश्वरी मंदिरात पोहोचली. मंदिराची प्रदक्षिणा करून पालखी गावठाण, जिल्हा परिषद शाळा मार्गे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आली. मार्गावर महिलांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. तसेच ठिकठिकाणी पायघड्या अंथरून, पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सजवलेली बैलजोडी व देखणा घोडा होते. पारंपरिक संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

ग्रामपंचायत कार्यालयासमोर असंख्य भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ तर रात्री ९ ते ११ या वेळेत झी टॉकीज फेम, पुणे येथील कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी गोडवली गावातील युवक, ग्रामस्थ आणि परिसरातील स्वामी भक्तांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!