रामवाडीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ; अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरण

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील रामवाडी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य धार्मिक सोहळ्याचा आज शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी विधिवत पूजनाने शुभारंभ करण्यात आला. श्रीराम मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा करून विणेकऱ्याच्या गळ्यात वीणा अर्पण करण्यात आली आणि “जय श्रीराम”च्या जयघोषात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. या प्रसंगी ग्रामस्थ, भाविक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

रामवाडी : श्रीराम मंदिरात विधिवत पूजन करून विणेकऱ्याच्या गळ्यात वीणा अर्पण करताना आणि जय श्रीरामच्या घोषात सप्ताहाचा शुभारंभ करतानाचे दृश्य.

 

श्रीराम यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थ मंडळ, रामवाडी यांच्या वतीने आयोजित या सप्ताहात २० ते २६ मार्चदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होऊन हरिनाम जप, सामूहिक वाचन, धार्मिक ग्रंथांचे पारायण असे उपक्रम पार पडणार आहेत. सायंकाळी हरिपाठ, प्रवचन आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे.

या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांचा सहभाग लाभणार आहे. ह.भ.प. शशी महाराज चोरगे (सातारा), ह.भ.प. संतोष महाराज भोसले (सातारा), ह.भ.प. रवी महाराज लोहार (करंडी), ह.भ.प. संदीप महाराज गुरव (पाडळी), ह.भ.प. संतोष महाराज भांदीर्गे (पानस) तसेच ह.भ.प. मीराताई दीक्षित (भुईंज) यांची कीर्तने भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवार दि. २६ मार्च रोजी समारोपाच्या दिवशी सकाळी १० ते १२.३० या वेळेत श्रीराम जन्मोत्सवाचे मुख्य कीर्तन ह.भ.प. संतोष महाराज ढाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर रात्री ९ ते ११ या वेळेत अमोल महाराज पाडळे यांचे जागराचे कीर्तन रंगणार आहे. तसेच शुक्रवार दि. २७ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. अविनाश महाराज जावळीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.

संपूर्ण सप्ताहभर विविध भजन मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून गावात सर्वत्र भक्तिरसाची उधळण होत आहे. या निमित्ताने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

या सोहळ्यासाठी विविध मान्यवर, संत-महंत तसेच भाविकांची उपस्थिती लाभणार असून सर्वांनी या धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटी, रामवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!