महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शकुंतला चोरमले, उपसभापतीपदी संजय मोरे बिनविरोध

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज पार पडली असून सभापतीपदी शकुंतला रमेश चोरमले तर उपसभापतीपदी संजय हरिश्चंद्र मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे महाबळेश्वर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीची सत्ता स्थापन झाली आहे.

सभापती पदी शकुंतला रमेश चोरमले, उपसभापती पदी संजय मोरे.. (फोटो)

महाबळेश्वर पंचायत समितीची निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी पार पडली होती, तर त्याचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून भिलार गणातून वंदना प्रवीण भिलारे आणि मेट–गुताड गणातून शकुंतला रमेश चोरमले विजयी झाल्या. तसेच शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून कुंभरोशी गणातून संजय हरिश्चंद्र मोरे आणि तळदेव गणातून संजय विठ्ठल शेलार हे निवडून आले होते.

 

सभापती पद मेट–गुताड गणासाठी आरक्षित असल्याने त्या गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला चोरमले यांची सभापतीपदी निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यामुळे सभापतीपदासाठी त्यांच्या नावाचेच एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाला.

 

दरम्यान, उपसभापती पदासाठी शिवसेना (शिंदे गट) चे संजय मोरे यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. इतर कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने चोरमले आणि मोरे यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीत पुरवठा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली राजमाने यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर गटविकास अधिकारी विजय विभुते यांनी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच तहसीलदार सचिन म्हस्के यांच्यासह इतर निवडणूक अधिकारीही उपस्थित होते.

या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे स्वरूप प्राप्त झाले असून आगामी काळात पंचायत समितीच्या विकासकामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!