परदेशात राहूनही गावासाठी धडपड : चंदनदादा चव्हाण यांच्याकडून १० गावांना सौर पथदिवे, ५ गावांना शुद्ध पाणी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील दाभे मोहन गावचे सुपुत्र आणि इटलीस्थित उद्योजक श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण (चंदनदादा) यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून त्यातून अनेक गावांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. सौरऊर्जा आणि शुद्ध पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी गावकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

परदेशात स्थायिक असूनही मातृभूमीशी असलेले नाते जपत चंदनदादा सामाजिक बांधिलकीतून सातत्याने काम करत आहेत. ग्रामीण भागात प्रकाश, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आधुनिक सौर पथदिव्यांचे विनामूल्य वाटप करण्याचा उपक्रम ते दरवर्षी राबवत आहेत.
या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४० ते ५० गावांमध्ये ४०० ते ४५० हून अधिक आधुनिक सौर पथदिवे विनामूल्य देण्यात आले आहेत. यामुळे दुर्गम भागातील रस्ते आणि वस्ती प्रकाशमान होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे. यावर्षीच्या टप्प्यात दाभे दाभेकर, घोणसपूर, गोरोशी, येरणे खुर्द, दरे (जावली), जावली, दुधोशी, खेतेश्वर देवालय पारूट आणि महारोळे या गावांना सौर पथदिवे देण्यात येणार आहेत. संबंधित गावांच्या प्रतिनिधींनी दि. १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत दाभे मोहन येथून पथदिवे घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे या उद्देशाने आधुनिक वॉटर फिल्टर प्रकल्पही राबवला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत १० गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
सन २०२६ मध्ये आमशी, हरचंदी, कुरोशी, घावरी आणि सौंदरी या गावांमध्येही हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चंदनदादांचे हे कार्य ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

