कासवंड (घामुनसेवाडी ) मध्ये रात्रीची चोरी करणारे चोर पाचगणी पोलिसांच्या ताब्यात; १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बांधकाम साईटवरून लोखंडी गज चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पाचगणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत ताब्यात घेत. त्यांचेकडून या कारवाईत चोरीस गेलेला सुमारे १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.

याबाबतची पोलिस स्टेशन मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास कासवंड–घामुनसेवाडी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे असलेल्या डॉ. दीक्षित यांच्या बांधकाम साईटवरून अंदाजे ४५० किलो वजनाचे लोखंडी गज चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी अजय हणुमंत भुजबळ (रा. विकासनगर, सातारा) याने अनिल रमेश ननावरे व चेतन दिलीप भणगे (दोघेही रा. वाई) यांच्या मदतीने लोखंडी गज टेम्पोमध्ये भरून चोरी करून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने तपास सुरू करत आरोपी व टेम्पोचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली.
स्थानिकांच्या मदतीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लोखंडी माल आणि टेम्पो असा एकूण १,७७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी (सातारा), अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलीस अंमलदार के. एच. रसाळ, एस. एम. थोरवे, पोलीस हवालदार व्ही. बी. आयगुडे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे व अमोल धर्म जगताप यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. सदर तिघा आरोपींविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निलेश माने करीत आहेत.

