महिला दिनानिमित्त पाचगणीत सुरेल संगीत मैफल; नगरसेवक प्रसाद कारंजकर यांच्या उपक्रमाचे कौतुक

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून पाचगणी शहरात सुरेल संगीताची मैफल रंगली. पाचगणी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सुरमय सुस्वर संगीत रजनी कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमातून स्थानिक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, तसेच उपस्थित महिलांचा विशेष सन्मानही करण्यात आला.

पाचगणी : महिला दिनानिमित आयोजित सुरमय संगीत रजनी कार्यक्रमात नवोदित कलाकार व मान्यवर आयोजक आदी

प्रथमतः कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी , नगरसेवक प्रसाद कारंजकर, पत्रकार रविकांत बेलोशे, सचिन टक्के, किशोर पुरोहित, अरुण गड्डा, रश्मी बोधे, साधना पिसे, आदी उपस्थित होते.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पाचगणी येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर हॉलमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थानिक कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने वातावरण भारावून टाकत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले. या कार्यक्रमात सौ. प्रियांका भंडारी, सौ. कल्पना पुरोहित, संदीप माने, सुरेश भिलारे, संजय चिकणे आणि महेश कांबळे या कलाकारांनी विविध मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित रसिक प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमात तालसाधना संगीत अकॅडमीचे मनोहर गेणुबा बगाडे यांनी आपल्या प्रभावी तबलावादनाने गायनाला सुंदर साथ देत संगीताच्या मैफलीत चारचाँद लावले. तबल्याच्या ठेक्यावर सादर झालेल्या गाण्यांनी कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.
या कार्यक्रमाला पाचगणी शहरातील नागरिक, महिला तसेच संगीताची आवड असलेले अनेक स्थानिक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद देत वातावरण आनंदमय केले.

यावेळी नगरसेवक प्रसाद कारंजकर यांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्व महिलांना व नागरिकांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्त्रीशक्तीचा सन्मान करणे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून महिलांच्या सर्वांगीण सशक्तीकरणासाठी अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत महिला दिनाचे वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करणाऱ्या या उपक्रमाचे पाचगणीतील नागरिकांकडून विशेष कौतुक व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!