पाचवड–पार्टेवाडी मार्गावर सकाळची नवी एसटी सेवा सुरू; प्रवाशांची दीर्घ प्रतीक्षा संपली
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचवड–पार्टेवाडी मार्गावरील प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत मेढा आगाराच्या वतीने सकाळच्या सत्रात नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सकाळी ७:४५ वाजता पार्टेवाडीहून पाचवडकडे येणारी ही नवी बस आजपासून सुरू झाली असून त्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाचवड–पार्टेवाडी ही एसटी सेवा हमखास उत्पन्न देणारी असून महसूल वाढविण्यात या मार्गाचा मोठा वाटा आहे. मात्र अलीकडे करण्यात आलेल्या वेळापत्रक बदलामुळे अनेक प्रवासी पर्यायी वाहतुकीकडे वळत होते. विशेषतः सकाळी शाळा आणि महाविद्यालयांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरदार वर्गाला वेळेत प्रवास करता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी जोर धरत होती.
या पार्श्वभूमीवर मेढा आगाराने तातडीने पाऊल उचलत ही नवीन सेवा सुरू केली आहे. या बसचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून सदर बस सकाळी ७:१० वाजता पाचवड येथून पार्टेवाडीकडे प्रस्थान करेल. ती ७:४० वाजता पार्टेवाडी येथे पोहोचेल आणि तेथून ७:४५ वाजता पुन्हा पाचवडकडे प्रयाण करेल.
या नव्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा तसेच गाडीची वेळ लक्षात ठेवून प्रवास करावा, असे आवाहन मेढा आगारप्रमुखांनी केले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार वर्गामध्ये समाधान व्यक्त होत असून एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या समस्येची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

