पाचगणीत ‘बरुचा बंगला’वर ईडीची धडक कारवाई; मनी लॉन्डरिंग प्रकरणी ; स्थानिक प्रशासनात मात्र संभ्रमाचे वातावरण
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) धडक कारवाई करत प्लॉट क्रमांक २२३ वरील ऐतिहासिक ‘बरुचा बंगला’मधील दोन-तृतीयांश अविभाजित हिस्सा आपल्या ताब्यात घेतला आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित ठिकाणी अधिकृत नोटीस चिटकविण्यात आली आहे. नोटीशीतील तपशिलांवरून कारवाईची माहिती स्पष्ट झाली आहे.

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, कारवाईदरम्यान स्थानिक पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती नसल्याने आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तता पाळल्याने परिसरात काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने (नोंद क्रमांक MBZO-I/07/08/2019) या प्रकरणाचा तपास करत संबंधित मालमत्ता जप्त केली आहे. उपसंचालक अमिताभ मिश्रा यांनी PMLA कायद्याच्या कलम ८ (४) अन्वये या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे अधिकृत नोटीसमधून स्पष्ट करण्यात आले आहे.
कारवाईचा घटनाक्रम : २० ऑक्टोबर २०२० : मालमत्तेवर तात्पुरता जप्ती आदेश (क्रमांक १३/२०२०) जारी.१५ एप्रिल २०२१ : नवी दिल्ली येथील निर्णायक प्राधिकरणाकडून जप्ती आदेशास मंजुरी.फेब्रुवारी २०२६ : प्रत्यक्ष कारवाई करत बंगल्याचा हिस्सा, जमीन, प्रवेशमार्ग आणि संबंधित सर्व सुविधा शासनाच्या ताब्यात.
जुनैद मेमन कनेक्शन :सदर कारवाई ही जुनैद इक्बाल मेमन यांच्याशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याची माहिती आहे. संशयित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, कारवाई सुरू असताना स्थानिक पातळीवर माहितीचा अभाव दिसून आला. पोलीस प्रशासनाकडे या प्रक्रियेबाबत अधिकृत तपशील उपलब्ध नव्हता. तसेच ईडी पथकाने सुरुवातीला मौन पाळल्याने परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर मालमत्तेवर लावण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमुळे ईडीच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले.
मालमत्ता हस्तांतरणास मनाई जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवर कोणतीही विक्री, भाडेकरार किंवा नवीन हक्क निर्माण करता येणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित मालमत्ता पूर्णपणे केंद्र सरकारच्या ताब्यात राहणार असून, अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच घेतला जाणार आहे.
“आर्थिक गुन्ह्यांविरोधात शासन कठोर पावले उचलत असल्याचा हा स्पष्ट संदेश आहे. पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी झालेल्या या कारवाईने मोठे धाबे दणाणले आहेत,” अशी प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.
▪ चौकट ;पाचगणीत ईडीने जुनैद मेमन यांच्या घाटजाई मंदिराजवळील खिंगर रस्त्यावरील तसेच मेट-गुताड येथील मिळकतींसह एकूण तीन मालमत्तांवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.
▪ चौकट
ही कारवाई पर्यटनस्थळी सुरू असताना ईडी अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती मिळण्यात अडचणी आल्या. संबंधित यंत्रणेचे उपसंचालक अमिताभ मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते.

