अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास; न्यायालयाचा कडक निर्णय

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  पाचगणी (ता. महाबळेश्वर) – अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व रुपये १५ हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल वाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार  दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३२/२०२३ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३७६(३), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी वसीम अकबर हुसेन रजा याने अल्पवयीन पीडितेच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. एस. के. भागवत (महाबळेश्वर पोलीस ठाणे) यांनी केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वाई येथील मा. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री. आर. एन. मेहरे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. दयाराम एस. पाटील यांनी कामकाज पाहिले, तर सहायक सरकारी अभियोक्ता श्री. महेश यू. शिंदे यांनी सहकार्य केले. या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.

साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे व इतर दाखले विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत भा.दं.वि. कलम ३७६(३), ५०६ तसेच POCSO कायद्यान्वये २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक, वैशाली कुडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, तसेच पाचगणीचे दिलीप पवार, व महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे एस के भागवत, अधिकाऱ्यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली. कोर्ट पैरवी अधिकारी भुजंगराव काळे, व पोलीस प्रॉसिक्युशन पथकातील किर्तीकुमार कदम, सहा फौजदार, अविनाश ढेरे, पो. हवा. हेमा कदम, शिवाजी पांब्रे, प्रीतम नाळे, सोमनाथ कुंभार, आदींनी खटल्याच्या सुनावणीत परिश्रम घेतले.

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांत न्यायालयाकडून कठोर शिक्षा सुनावण्यात येत असल्याने अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!