टेबललँड वरील तळ्याच्या सुशोभीकरणास प्रारंभ; ‘अमृत-२’ योजनेतून ४.६२ कोटींच काम..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मदत व पूर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निधीतून ‘अमृत-२’ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ४ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीतून टेबललँडवरील तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पाचगणीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, राजेंद्र पारठे, महेश खांडके, आकाश बगाडे, विमल भिलारे, अमृता गोळे, माधुरी कासुर्डे, शिल्पा माने, स्वीकृत नगरसेवक गणेश कासुर्डे, अनिता चोपडे, टेबललँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, इम्रान क्षीरसागर, फिरोज शेख, ठेकेदार मिलिंद कणसे, राजेश तेंडुलकर, भरत मोहिते, नगरपरिषदेचे सल्लागार अभियंता निखिल पवार, नगरअभियंता अभिजित सोनावले, आदी मान्यवर उपस्थित होते.
कामाची माहिती देताना श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे प्रणेते शेखर कासुर्डे यांनी सांगितले की, टेबललँडवरील तळे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र संध्याकाळनंतर येथे पुरेशी सोय नसल्याने पर्यटक लवकर परतत असत. या पार्श्वभूमीवर तळ्याचे गळतीचे प्रश्न दूर करून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. तळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई, सुशोभित पदपथ आणि सुरक्षितता उपाययोजना करण्यात येणार असल्याने रात्रीच्या वेळीही पर्यटक येथे वेळ घालवू शकतील.
या प्रकल्पामुळे पर्यटन कालावधी वाढण्यास मदत होणार असून स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. टेबललँड परिसरात पर्यटनाची आर्थिक उलाढाल वाढून शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
चौकट : पाचगणीच्या पर्यटन नकाशावर टेबललँडचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे सुशोभीकरण महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

