पाचगणी प्रभाग ४: मेमन आणि कासुर्डे यांच्या प्रचाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; विरोधकांना मोठे आव्हान!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत, पाचगणी प्रभाग ४ (अ आणि ब) मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या माजी नगराध्यक्षा परवीन मेमन आणि शेखर कासुर्डे यांना स्थानिक नागरिकांकडून प्रचंड आणि वाढता जनसमर्थन मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
मेमन आणि कासुर्डे यांनी प्रभागात सुरू केलेल्या ‘घरोघरी संपर्क अभियाना’दरम्यान, महिलांपासून तरुणांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांतही त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. प्रचाराच्या पहिल्या काही दिवसांतच त्यांना मिळालेला हा भरघोस प्रतिसाद त्यांच्या उमेदवारीला नवी गती देत असल्याचे जाणकार मत व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परवीन मेमन यांच्याविषयी लोकांमध्ये अढळ विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासामागे त्यांची सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, सर्वसामान्यांना केलेली मदत, आणि प्रभागातील पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी केलेले अथक प्रयत्न ही प्रमुख कारणे आहेत. मेमन यांनी आपल्या प्रचारामध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले आहे, ज्यात स्वच्छता, पाणीपुरवठा सुरळीत करणे, महिला सक्षमीकरण व आरोग्य सुविधा वाढवणे, रस्ते-विकास आणि युवकांसाठी उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.
माजी नगराध्यक्षा म्हणून परवीन मेमन यांचा अनुभव आणि शेखर कासुर्डे यांची सामाजिक बांधिलकी, या दुहेरी ताकदीला नागरिक पसंती देत आहेत. हे दोन्ही उमेदवार सध्या ‘घर टू घर’ प्रचार करत असून, प्रत्येक वस्तीत त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी हे दोन्ही उमेदवार प्रभावी ठरतील, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या वाढत्या जन-ओघामुळे, प्रभाग ४ मधील निवडणूक आता मेमन आणि कासुर्डे यांच्या बाजूने अधिक गतीने झुकताना दिसत आहे.

