महाबळेश्वर तालुक्यात महायुतीत फिफ्टी–फिफ्टी सत्ता; भिलारवर राष्ट्रवादीचा गजर, तळदेववर शिंदेसेनेचा “धनुष्यबाण” चा वेध

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनी तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट केले असून भिलार गट व त्याअंतर्गत भिलार आणि मेट–गुताड गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचा) जोरदार गजर घुमला आहे. तर पश्चिम विभागातील तळदेव गट तसेच तळदेव व कुंभरोशी गणांवर शिंदेसेनेने पूर्णतः धनुष्यबाणाचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांनी परस्परांशीच लढत देत तालुक्यात फिफ्टी–फिफ्टी सत्ता वाटणी साध्य केल्याचे चित्र समोर आले आहे.

पूर्व भागातील भिलार गटावर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा प्रभावीपणे वाजली. जिल्हा परिषद भिलार गटातून राष्ट्रवादीचे संजय केळगणे यांनी ८७८८ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यावर ६०९३ मतांचे मोठे मताधिक्य घेतले. भिलार गणातून वंदना भिलारे यांनी ५१३४ मते मिळवून ४१४४ मतांनी दणदणीत विजय संपादन केला. मेट–गुताड गणात शकुंतला चोरमले यांनी २७८४ मते घेत १०८६ मतांचे मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

 

याउलट तालुक्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेच्या धनुष्यबाणाने अचूक निशाणा साधत तळदेव गट पूर्णतः आपल्या ताब्यात घेतला. तळदेव गटातून शिंदेसेनेचे अजित संकपाळ यांनी ७६७३ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर ३००० मतांचे भक्कम मताधिक्य घेतले. तळदेव गणात संजय शेलार यांनी ४२८२ मते मिळवून प्रतिस्पर्ध्याला २०१० धोबीपछाड दिला. कुंभरोशी गणात संजय मोरे यांनी २७७२ मते घेत ३३४ मतांनी निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

 

महाबळेश्वर तालुक्यावर स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेनेने तळदेव गट आणि कुंभरोशी गण ताब्यात घेतले होते, मात्र तळदेव गण राष्ट्रवादीकडे राहिला होता. या पंचवार्षिक निवडणुकीत शिंदेसेनेने तोही जिंकून संपूर्ण तळदेव गटावर आपला झेंडा रोवला आहे.

दरम्यान, तालुक्याच्या पूर्व विभागातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले होते. ऐन निवडणूक काळात अनेक पक्षप्रवेश घडवून आणत लढत चुरशीची होईल, असे वातावरण निर्माण करण्यात आले. मात्र जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी प्रभावी संघटन व स्थानिक ताकदीच्या जोरावर भिलार गटावर राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित ठेवत आपली पकड सिद्ध करून दाखवली.

 

निवडणूक काळात भाजपने भिलार गटात आक्रमक भूमिका घेत रणशिंग फुंकले होते. मात्र संघटनात्मक कमकुवतपणाचा फटका बसत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या घड्याळाची टिकटिक वाजवत विजयाची पुनरावृत्ती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!