प्रस्थापितांना घरी बसवण्याचा विडा” : म्हसवे गटात सर्वपक्षीय महाआघाडीची ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन रॅली

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा ​करहर: म्हसवे जिल्हा परिषद गट आणि गणाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, आज सर्वपक्षीय उमेदवारांनी काढलेल्या ऐतिहासिक प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. “प्रत्येक वेळी मीच उमेदवार” म्हणणाऱ्या प्रस्थापितांना घरी बसवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या पोराला सत्तेत बसवण्यासाठी ही निवडणूक असल्याचे जाहीर करत शिवसेनेचे (शिंदे गट) संदीप पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे. या महाशक्ती प्रदर्शनामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात आता सर्वपक्षीय महाआघाडीने विजयाचा जणू विडाच उचलला असल्याचे चित्र दिसत आहे.

शिंदेसेनेचे म्हसवे गटाचे उमेदवार संदीप पवार, खर्शी-बारामुरे गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल गोळे आणि म्हसवे गणाच्या उमेदवार शिल्पा शिंदे यांच्या प्रचारार्थ ही भव्य रॅली काढण्यात आली होती.

सनपाने, आखाडे, काळेवाडी, हुमगाव, वालुथ, रामवाडी अशा विविध गावांतून ही रॅली जेव्हा करहर बाजारपेठेत दाखल झाली, तेव्हा आसमंत “आता वाजवा तुतारी” आणि “ओढू धनुष्याची दोरी” अशा घोषणांनी दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजरात आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे.


यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल गोळे यांनी अत्यंत भावनिक उद्गार काढले. “करहरचा विठ्ठल आज मला पावणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही जी विकासाची गंगा घराघरांत पोहोचवली, तीच कामे आज आम्हाला विजयाचा आशीर्वाद मिळवून देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विठ्ठल गोळे यांच्या माथाडी युनियनमधील कार्याची आणि दांडग्या जनसंपर्काची ताकद या रॅलीत स्पष्टपणे दिसून येत होती.

या रॅलीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला! रणरागिणींनी स्वतःहून पुढे येत उमेदवारांचे ठिकठिकाणी औक्षण केले आणि विजयाचा टिळा लावला. महिलांचा हा उत्स्फूर्त सहभाग पाहून ही निवडणूक आता उमेदवारांची राहिली नसून ती जनतेची चळवळ बनल्याचे जाणवत होते. माथाडी नेते राहुल पवार, नितीन गोळे, समीर गोळे आणि अविनाश दुर्गावळे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने या रॅलीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

संदीप पवार यांनी यावेळी युवकांना साद घालताना सांगितले की, ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. “सामान्य कुटुंबातील तरुणांना संधी मिळावी यासाठी मी मैदानात उतरलो असून, जनतेने आता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. या रॅलीमुळे म्हसवे गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आगामी मतदानामध्ये हा महायुतीचा झंझावात विरोधकांना चारी मुंड्या चित करणार, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!