घाटजाई देवी यात्रेनिमित्त पांचगणी शहरात दोन दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल; पोलीस प्रशासनाची अधिसूचना जारी..

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : येथील श्री घाटजाई काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा दि. १० फेब्रुवारी प्रारंभ होत असून ११ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेनिमित्त पाचगणी शहरात असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आल्याचे पाचगणी पोलिस प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.

याबाबत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (भापोसे) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. सदर अधिसूचना दि. ११/०२/२०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते दि. १२/०२/२०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे.
वाहतूक मार्गातील बदल
१) महाबळेश्वरकडून वाईकडे जाणारी वाहतूक
ही वाहतूक एस.टी. स्टँड चौक पाचगणी मार्गे, राहिल प्लाझा, टेबल लँड कॉर्नर, अपना हॉटेल, मिमनगर, जुने पोलीस ठाणे मार्गे मेन रोडकडे वळविण्यात आली आहे.
२) वाईकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक
ही वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, चेसन रोड, शॉलम हायस्कूल, न्यू इरा हायस्कूल, गार्गे, रश्मी चौक मार्गे मेन रोडकडे वळविण्यात आली आहे.
अवजड वाहनांसाठी विशेष व्यवस्था
सकाळी ११.०० ते रात्री २३.५९ वाजेपर्यंत अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
१) महाबळेश्वरवरून वाई–पुणे बाजूकडे जाणारी अवजड वाहने
ही वाहने संजीवन नाका मार्गे करहर, कुडाळ, पांचवड मार्गे पुण्याकडे जातील.
२) पुण्याहून महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहने
ही वाहने पांचवड मार्गे कुडाळ, करहर, संजीवन नाका मार्गे महाबळेश्वरकडे जातील.
वाहतूक ज्या-ज्या ठिकाणी वळविण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी व वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी व पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!