हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलारच्या 1999 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा भिलार : : हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथील सन १९९९ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, सुनील गुरव, अरविंद पवार तसेच विद्यमान मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, संतोष मालुसरे, कल्पेश गायकवाड, शांताराम जाधव, नेहा शिंदे उपस्थित होते.

नितीन भिलारे म्हणाले बाळासाहेब भिलारे यांनी ग्रामीण भागातील मुले, मुली शिकव्यात या उद्देशाने शाळा सुरु केली.या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये बसून तुम्ही शिक्षण घेतले, मैत्रीचे धडे शिकलात, संस्कार मिळवले आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळवली. आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असलेल्या तुम्हा सर्वांकडे पाहून बाळासाहेब भिलारे दादा यांचे स्वप्न साकार झाले याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे

संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे म्हणाल्या

आपण सर्वजण आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी झालात, हीच आपल्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या कष्टांची खरी पावती आहे. आजच्या पिढीसमोर अनेक संधी आहेत, परंतु त्याचबरोबर अनेक आव्हानेही आहेत. अशा वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी नाते कायम ठेवून पुढील पिढीला मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे.

या वेळी प्रकाश बेलोशे, अरविंद पवार, सुनील गुरव, मुकुंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी विध्यार्थी विनोद उंबरकर, दीपाली फुले, किरण धनावडे यांनी शाळेतील विविध आठवणी, शिक्षकांचे योगदान आणि जीवनातील यशस्वी वाटचालीतील शाळेच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेत स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनंतर भेट झाल्याने वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले होते.

या स्नेहमेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला

विकास भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत गोळे यांनी आभार मानले

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थ्यांनी तसेच विद्यालय प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!