पाचगणीत गुन्हेगारावर कडक कारवाई; भरत मालुसरेला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे (रा. गोडवली, पो. खिंगर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याच्यावर कठोर कारवाई करत त्याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाचगणी पोलिसांचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

पाचगणी पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार
भरत मालुसरे याच्याविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात यापूर्वी शारीरिक इजा तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांना दहशतीखाली जीवन जगावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या.
या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिसांनी संबंधित गुन्हेगाराविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून सातारा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी सखोल पडताळणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पुढे हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांच्याकडे पाठवण्यात आला.
उपविभागीय दंडाधिकारी श्री. योगेश खरमाटे यांनी आदेश क्रमांक एमएजी/हद्दपार/एसआर-०६/२०२५, दिनांक १० एप्रिल २०२६ अन्वये भरत मालुसरे याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पारित केला.
या कारवाईमुळे पाचगणी परिसरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत व निर्भयपणे सुरू राहण्यास दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इतर इसमांवरही अशाच प्रकारची कडक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने आणि पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

