पाचगणीत श्री स्वामी समर्थ पालखीचे भक्तीमय स्वागत; असंख्य स्वामी भक्तांनी घेतला स्वामी दर्शनाचा लाभ..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या श्री स्वामी समर्थ पालखीचे पर्यटननगरी पाचगणी येथे सोमवारी (३ मार्च) सकाळी भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात आगमन झाले. शहरात सर्वत्र “ ढोल पथकाच्या निनादात शांती कॉटेज विसावा स्थानी विसावल्यावर असंख्य स्वामी भक्तांनी स्वामी पादुकांचे दर्शन घेतले.

पाचगणी येथे सकाळी १० वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामी पादुकांचा आगमन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर माने गल्ली, जावळी बँक, गावठाण आणि मुख्य बाजारपेठ मार्गे ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मिरवणुकीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागील शांती कॉटेज येथे पालखीचा विसावा झाला. त्या ठिकाणी पादुकांचे आगमन होताच पुन्हा अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर पादुका दर्शन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शहर व परिसरातील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी स्थानिक स्वामीभक्तांनी परिश्रम घेतले.

