ग्रामीण शिक्षणाला बळकटी : राजपुरी जिल्हा परिषद शाळेसाठी सुसज्ज इमारत उभारणार  

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक सातत्याने मेहनत घेत असून या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे पालकांनीही जिल्हा परिषद शाळांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे यांनी केले.

(राजपुरी) तालुका – महाबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन व प्रशस्त शाळा इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात राजपूत बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयासह गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून शाळेचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावला जात आहे.

 

येत्या काळात शाळेसाठी सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी प्रशस्त शाळा इमारत उभारण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देऊन शाळेच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

या प्रकल्पांतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित असून त्यामध्ये सुसज्ज शाळा इमारत, शौचालये, हॅन्डवॉश स्टेशन, पेव्हर्स ब्लॉक आदी मूलभूत सुविधांचा समावेश आहे. ही सर्व कामे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!