पाचगणीत १८ ऑक्टोबरला ‘काव्यगंध’ पर्व सहावे; कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा | पाचगणी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि साहित्य, कविता व काव्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या वतीने ‘काव्यगंध’ पर्व सहावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून भोसे, पाचगणी येथील हॉटेल आयव्ही पार्क येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी आणि ‘दंगलकार’ म्हणून परिचित असलेले नितीन चंदनशिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ कवी, साहित्यिक व शैक्षणिक सल्लागार लक्ष्मीकांत रांजणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
काव्यगंधच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह साहित्यप्रेमींना काव्यविश्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. कविता, साहित्य आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून नवोदित कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या साहित्यिक सोहळ्याला पाचगणी व परिसरातील नागरिक, साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूलच्या व्यवस्थापनाने केले आहे.

