बोपर्डी ग्रामपंचायत बनली मुख्यमंत्री पंचायत राज आदर्श.. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रशासकीय कामाची दखल..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बोपर्डी (ता. वाई) ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे सुरू असून, गाव विकासाच्या नव्या टप्प्यावर वाटचाल करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने प्रशासकीय स्तरावरही बोपर्डीच्या कामाचे कौतुक केले जात आहे. अभियानांतर्गत वनराई बंधारे, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा जनजागृती आदी पर्यावरणस्नेही उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक आठवड्यात मंगळवारी सामूहिक श्रमदान करून गावातील स्वच्छता राखली जात असून, प्लास्टिक बंदीसाठी कागदी पिशव्यांचा वापर प्रोत्साहित केला जात आहे. प्लास्टिक संकलन मोहीमही जोमात सुरू आहे. आरोग्य क्षेत्रात ‘अॅनिमिया मुक्त गाव’ मोहिमेअंतर्गत तपासणी आणि जनजागृती केली जात आहे. संपूर्ण गावासाठी बंदिस्त गटार योजना वेगाने पुढे सरकत आहे. गावातील बचतगटांची वाढ, उद्योग-व्यवसायांना चालना, डिजिटल साक्षरता, कर वसुली, लोकवर्गणी, देवालये व कार्यालयांची स्वच्छता, तसेच पाणंद रस्ते तयार करणे अशा विविध कामांचा समावेश या अभियानात आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रभावी नियोजनाला प्रगतीचे श्रेय
या सर्व प्रगतीचे श्रेय ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रभावी नियोजनाला दिले जात आहे. सरपंच शंकर गाढवे, उपसरपंच ऋषीकेश गाढवे, सदस्य आनंदा गुरव, रणजित गाढवे, समीर भिंताडे, ज्योती सातपुते, भारती पवार, दिपाली घाटे, सिंधू गाढवे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी शंकर चिकटूळ यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन गावात कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा तीन टप्प्यांचे वेळापत्रक तयार करून जबाबदाऱ्या वाटपाच्या पद्धतीने कामकाजाला गती देण्यात आली आहे.
विकासाचा आदर्श गावांसाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना.
या अभियानात अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशा सेविका, सीआरपी आणि सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने बोपडींमध्ये आदर्श लोकसहभाग दिसून येत आहे. बोपर्डी ग्रामपंचायतीने लोकसहभाग आणि सक्षम प्रशासकीय नियोजन यांच्या संयोगातून उभा – केलेला विकासाचा आदर्श गावांसाठी मार्गदर्शक ठरत असून, बोपर्डी लवकरच ‘समृद्ध’ आणि ‘आदर्श गाव’ म्हणून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

