अल्पवयीन मुलीचे अपहरणप्रकरण उघड; पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत

Spread the love

गिरीस्थान टाईम्स  वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत आरोपीस अटक केली असून पीडित मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०८/२५ अन्वये मा. न्या. सं. कलम १३७ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी सनी गौतम कुचेकर (वय २६, रा. मुगाव, पो. सोनेरी, ता. परांडा, जि. धाराशिव) याने पाचगणी येथील १२ वर्षे ८ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील तिच्या राहत्या घरातून तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पळवून नेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पाचगणी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून आरोपी व मुलीचा शोध सुरू केला. परांडा (जि. धाराशिव) व करमाळा (जि. सोलापूर) परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र आरोपी मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवून ठावठिकाणा बदलत असल्याने तो मिळून येत नव्हता. अखेर पोलिसांच्या कसोशीच्या प्रयत्नातून आरोपी व पीडित मुलगी अंबरनाथ (जि. ठाणे) येथे सापडले.

पोलिसांनी आरोपी सनी गौतम कुचेकर याला ताब्यात घेऊन अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित अल्पवयीन मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या संपूर्ण कारवाईत  पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, सहा. फौजदार रविंद्र कदम, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, निलेश माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा फरांदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित मोहिते यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!