पाचगणी नगरपरिषदेत ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’ सत्तेवर; आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत नोंदणी  

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे स्थानिक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी (प्रणित) अपक्षांनी घवघवीत यश मिळवत नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. नगरपरिषदेतील १५ अपक्ष नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावरही अपक्ष उमेदवाराने बाजी मारल्याने एकूण १६ सदस्यांच्या बळावर ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’च्या नावाने सत्ता स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या नोंदणी कार्यक्रमाला खासदार नितीन (काका) पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे, नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारटे, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, राजश्री सणस, अमृता गोळे, माधुरी कासुर्डे, स्वाती कांबळे, शिल्पा माने, विमल भिलारे, सुप्रिया माने आदी नगरसेवकांनी उपस्थिती लावली.

नोंदणी प्रक्रियेचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पाचगणी नगरपरिषदेत आता अधिकृतपणे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या पाठबळावर ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’ची सत्ता विराजमान झाली आहे. या सत्तास्थापनेमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, पर्यटननगरी पाचगणीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील, तसेच पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवनिर्वाचित आघाडीच्या नेतृत्वाखाली पाचगणी नगरपरिषदेत स्थिर आणि विकासाभिमुख कारभार सुरू होणार असल्याने शहरवासीयांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!