छत्रपती शिवाजी महाराज अनावरण सोहळा नेत्रदीपक रोषणाई व शिवमय जयघोषात संपन्न..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकार्पण पारंपारिक वाद्यांच्या गजरात, नेत्रदीपक आकर्षक विद्युत रोषणाई आणि भगवी वस्त्रांकित सजावट, कोनशिला अनावरण सोहळा शिव गर्जनांच्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

पाचगणी, (ता. – महाबळेश्वर ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौथरा अनावरण प्रसंगी पारंपरिक ढोल वाजवीत घोडदौडीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचगणी बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दिंडी मिरवणूक सोहळा शिवप्रेमी शिवभक्त महिला, पुरुष आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. सर्वत्र भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि “जय शिवाजी, जय भवानी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
प्रारंभी सकाळपासूनच धार्मिक विधिवत कार्यक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवमय झाला होता. भजन, शिवभक्त, शिवप्रेमींची रेलचेल यामुळे परिसर उल्हासीत प्रसन्न झाला होता.
स्मारकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, या मान्यवरांच्या हस्ते होऊन आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला नागरिक, शिवप्रेमी,राजकीय, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची “शिव गर्जना” सादर करत आलेल्या पाहुण्यांचे आणि नागरिकांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान दाटला आणि वातावरणात उत्साहाची लहर पसरली.
भगवे झेंडे, भगव्या पताका आणि भगव्या टोप्यांनी पाचगणी परिसर भगवामय झाला होता. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वातावरणात उत्साह, अभिमान आणि शिवभक्तीचा उन्मेष जाणवत होता.
शिवजयंती उत्सव समिती, नगर परिषद आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून हा भव्य सोहळा पार पडला. संध्याकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत जिवंत देखावा, लेझीम ढोल, शौर्यगीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. स्मारक परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघाला होता.
हा लोकार्पण सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर शिवस्वराज्याच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची पुनःस्मृती घडवणारा उत्सव ठरला. या अनावरण सोहळा यशस्वी करण्याकरिता शिवजयंती उत्सव समितीतील सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

