रामवाडीतील श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा; पालखी सोहळ्याने गाव दुमदुमले, भाविकांची मोठी उपस्थिती

Spread the love

गिरीस्थान टाइम्स वृत्तसेवा पाचगणी : रामवाडी ता. जावळी  येथे “श्री” रामनवमी उत्सव अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाच्या निमित्ताने श्रीराम मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. मंदिर परिसरात विविध रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न व आल्हाददायक झाले होते. रामनवमीच्या निमित्ताने रामवाडीतील प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

श्रींची पालखी मिरवणूक – दर्शन घेताना भाविक

या सोहळ्यासाठी परगावी नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले चाकरमानीही गावाकडे परतले होते. तसेच बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांची वर्दळ वाढल्याने गावात उत्सवाचे स्वरूप अधिकच खुलले होते. सर्वत्र “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
रामनवमीच्या दिवशी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ९ ते १० या वेळेत पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी सुमधुर भजन सादर केले. पुढे सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. संतोष महाराज ढाणे यांचे श्रीराम जन्मोत्सवावर आधारित कीर्तन झाले. महिलांच्या सुस्वर पाळणा गायनाने श्रीराम जन्म सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
यानंतर भाविकांनी श्रींचे रांगेतून दर्शन घेतले. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी व पाहुण्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या वतीने उत्तम नियोजन केल्यामुळे सर्व भाविकांना समाधानकारक सेवा मिळाली.
दुपारी ३ ते ५ या वेळेत दिंडी सोहळा व श्रींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत हरिनामाच्या गजरात सहभाग नोंदवला. ढोल-लेझीमच्या गजरात संपूर्ण गाव दुमदुमून गेले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा अत्यंत अविस्मरणीय ठरला.
रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अमोल महाराज यांचे कीर्तन झाले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी सजलेला हा श्रीरामनवमी उत्सव रामवाडी ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!