भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत पाचगणीला स्थान; मंगेश उपाध्याय उपाध्यक्ष, मेहुल पुरोहित चिटणीस
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नव्या जिल्हा पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून या निवडीत महाबळेश्वर तालुक्याला महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे दिसून येत आहे. पाचगणी शहरातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मंगेश उपाध्याय यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मेहुल पुरोहित यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अनुभवी व समर्पित कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आल्याचे पक्ष वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
मंगेश उपाध्याय हे भाजपचे सुरुवातीपासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पाचगणी शहरासह महाबळेश्वर तालुक्यात जनसंपर्क वाढवणे, विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करणे आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे या कामात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मेहुल पुरोहित यांनीही पक्षाचे कट्टर व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. भाजपची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेत त्यांना जिल्हा चिटणीसपदाची संधी देण्यात आली आहे.
या निवडीमुळे पाचगणी व महाबळेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

