पाचगणीत ‘स्वच्छ उत्सव’ची हाक; नैसर्गिक रंगांनी साजरी करा पर्यावरणपूरक होळी

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले हिलदारी उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियान व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत स्वच्छ उत्सव – पर्यावरणपूरक उत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने नागरिक व पर्यटकांनी होळीचा सण नैसर्गिक व रसायनमुक्त रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

होळीच्या काळात रासायनिक रंगांच्या अतिरेकी वापरामुळे पाणीप्रदूषण, त्वचाविकार तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम वाढतात. पाचगणीसारख्या निसर्गसंपन्न व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळासाठी हे धोके अधिक गंभीर ठरू शकतात. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे नगरपरिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत हिलदारीच्या सहकार्याने शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेले नैसर्गिक होळीचे रंग नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालक, बीट व झेंडूच्या फुलांपासून तयार करण्यात आलेले हे रंग त्वचेस सुरक्षित, रसायनमुक्त व पूर्णतः नैसर्गिक आहेत.

सदर रंगांसाठी नागरिकांनी तेजस्विनी महिला बचत गट, नंदिनी महिला बचत गट व प्रज्ञा स्वयंसहायता बचत गट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगारनिर्मितीची संधी मिळत असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.
पाचगणीत यापूर्वी इको-फ्रेंडली गणेशोत्सव, फटाके मुक्त दिवाळी यांसारखे उपक्रम राबविण्यात आले होते. त्यानंतर आता पर्यावरणपूरक होळीच्या माध्यमातून शहर आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जाणीव निर्माण करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच आनंदासोबत सामाजिक जबाबदारीची भावना रुजवणे हा आहे.

मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीप भाऊ बागडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, आरोग्य सभापती राजश्री सणस व सर्व नगरसेवक यांनी नागरिक, पर्यटक, हॉटेल व्यावसायिक व शैक्षणिक संस्थांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, रासायनिक रंग व प्लास्टिक टाळावे, पाण्याची नासाडी करू नये आणि कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाचगणी शहर यंदाची होळी रंगतदारच नव्हे तर जबाबदार पद्धतीने साजरी करण्याच्या दिशेने पुढाकार घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!