महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा ओघ वाढला : चौथ्या दिवशी १२ नामनिर्देशन पत्रे दाखल, भिलार गट अजूनही शांत

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ लागला आहे. आज निर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद तळदेव गट ३ आणि पंचायत समितीच्या भिलार ३, मेट-गुताड १, कुंभारोशी २ आणि तळदेव ३ या गणांसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद भिलार गटासाठी आजही एकही अर्ज दाखल न झाल्याने भिलार अजूनही शांत आहे.

आजही उमेदवारी अर्ज खरेदीचा ओघ कायम राहिला असून १२ अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ९९ अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज दाखल करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांमध्ये जिल्हा परिषद तळदेव गटातून अजित रामचंद्र संकपाळ (शिवसेना), रेणुका अजित संकपाळ (अपक्ष) आणि संजय रामचंद्र गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. पंचायत समिती कुंभारोशी गणातून सचिन श्रीरंग उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि संजय हरिश्चंद्र मोरे (शिवसेना) यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

तळदेव गणातून संजय विठ्ठल शेलार (शिवसेना), गोविंद देवजी संकपाळ (अपक्ष) आणि अभिषेक आत्माराम शिंदे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवली आहे. मेट-गुताड गणातून शकुंतला रमेश चोरमले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

 

भिलार गणातून पूनम निलेश गोळे (अपक्ष), सविता रामचंद्र गोळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि वंदना प्रवीण भिलारे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, जिल्हा परिषद भिलार गटासाठी अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याने त्या गटातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

एकूणच महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळीला हळूहळू सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या लक्षणीय वाढेल, असे चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मैदानात उतरू लागल्याने निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!