महाबळेश्वर तालुक्यासाठी १ कोटींचा विकासनिधी मंजूर; विकासकामांना व व्यायामशाळांना मिळणार नवे बळ
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि गावागावांत मूलभूत सोयी-सुविधांचे जाळे विणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी झेप घेतली आहे. भाजपचे महाबळेश्वर तालुकाप्रमुख अनिल नाना भिलारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल १०० लक्ष रुपये (१ कोटी) निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे अनेक गावांमधील रस्ते, सिमेंट काँक्रिटीकरण व व्यायामशाळांच्या इमारतींची कामे मार्गी लागणार असून, संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या शासन निर्णयानुसार तालुक्यातील दुर्गम व महत्त्वाच्या भागांमध्ये पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये दानवली गावातील गिरण ते गणपती डोह रस्ता, उंबरी, कासवंड, खिंगर व गोडवली येथील अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण, तसेच मेटगुताड येथील जान्नीमाता मंदिर ते साज हॉटेल या डांबरी रस्त्याचा समावेश आहे. धनगरवाडी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन तेथे सुसज्ज व्यायामशाळा इमारत उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे.
अनिल नाना भिलारे यांच्या विकासोन्मुख नेतृत्वामुळेच हा निधी खेचून आणणे शक्य झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला या विकासकामांच्या माध्यमातून सडेतोड उत्तर मिळाल्याचेही बोलले जात आहे. भाजपच्या विकासधारेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विकासाच्या मुद्द्यावर प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाल्याने सामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या विकासकामांच्या मंजुरीबद्दल व उद्घाटनप्रसंगी तालुकाप्रमुख अनिल नाना भिलारे, भाजपचे सरचिटणीस जगन्नाथ भिलारे, अमोल चोरमले, मोहन गोळे, मधुकर गोळे, अनिल बोधे, किरण पुरोहित, नारायण देवघर, सुनील जाधव, मधुकर बिरामने, संतोष धनावडे, रवी दानवले, विकास दानवले, प्रदीप दानवले, नारायण कासुर्डे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री जयकुमार गोरे आणि अनिल नाना भिलारे यांची ही ‘विकास जोडी’ तालुक्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

