पाचगणीच्या परिवर्तनाचा संकल्प; “ग्लोबल अनुभवासह सुनील बगाडे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात.. पाचगणी करांचा वाढता पाठिंबा…
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आगामी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करताना सुनील शरद बगाडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे सर्वसमावेशक व्हिजन आणि मिशन मांडत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. पर्यटन नगरी पाचगणीचे रूपांतर आधुनिक, स्वच्छ आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या मॉडेल हिल-स्टेशनमध्ये करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला असून, त्यांना शहरातील सर्वच स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

६२ देशांचा प्रवास करून जागतिक पर्यटनाचे अनुभव मिळवलेल्या बगाडे यांनी सांगितले की, “इतर देशांतील पर्यटन व्यवस्थापन, सुविधांचा विकास व रोजगारनिर्मितीची मॉडेल्स पाचगणीत राबवण्याची माझी इच्छा आहे. केवळ चार पॉइंट्सवर अवलंबून असलेल्या आपल्या पर्यटनाला नवे पॉइंट्स, आधुनिक ॲडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज, व विविध अनुभवात्मक पर्यटन सुविधा जोडून आपण प्रचंड वाढ देऊ शकतो.”
पर्यटन वाढीसोबत स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उभ्या करण्याची हमी देत बगाडे म्हणाले की, “हॅण्डीक्राफ्ट, स्थानिक उत्पादने, आधुनिक बाजारपेठा, युवकांसाठी रोजगार व उद्योगसंधी—हे माझ्या मिशनचा प्रमुख भाग आहे.”
पाचगणीला स्वच्छतेत पुरस्कार प्राप्त असतानाही प्रत्यक्षात शहरात स्वच्छता कमी जाणवते, याकडे बगाडे यांनी लक्ष वेधले. “पाचगणी पुन्हा स्वच्छतेत आदर्श बनवणे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणे आणि प्लास्टिकमुक्त शहर घडवणे ही माझी प्राथमिक उद्दिष्टे आहेत,” असे बगाडे यांनी स्पष्ट केले.
सुनील बगाडे यांच्या या सर्वसमावेशक विकास आराखड्याला पाचगणीकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे.

