पाचगणी पुन्हा विकासाच्या शिखरावर! माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर मैदानात; मतदारांना ‘गतवैभव’ प्राप्तीचे आवाहन..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपालिकेच्या रणसंग्रामात सध्या मतांचे वॉर जोरदारपणे सुरू झाले आहे. मात्र, माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कहऱ्हाडकर यांनी प्रचाराच्या धुमधडाक्यात शहरभर फिरून आता ‘विकासाची राळ’ उडवली आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष भाऊ कांबळे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असून, कहऱ्हाडकर यांच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चांना उधाण आले आहे.

माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कहऱ्हाडकर या केवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठीच नव्हे, तर आपल्या विचारांच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्यांच्या विविधांगी प्रचारामुळे शहरवासीयांमध्ये पुन्हा एकदा पाचगणीच्या भविष्याची आशा निर्माण झाली आहे.
स्वच्छतेत नंबर वन’ची किमया पुन्हा घडवणार!
लक्ष्मी कहऱ्हाडकर यांनी सातत्याने पाचगणी शहरात विकासाची ‘गंगोत्री’ पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यकाळात पाचगणी शहराला स्वच्छतेत देशभरात नंबर वन ठेवण्याची किमया त्यांनी साधली होती. आता, शहराला आणखी सर्वोच्च पदावर नेण्याची आणि विकासाचे एक नवे ‘आयडॉल’ बनवण्याची संकल्पना त्यांनी मतदारांसमोर मांडली आहे.
प्रशासन राज’मुळे शहराची वाताहत; ‘पुनर्प्राप्ती’साठी मतदारांना साद !
माजी नगराध्यक्षांनी यावेळी शहराच्या सध्याच्या अवस्थेवर बोट ठेवले. गेल्या काही वर्षांपासून पाचगणीत ‘प्रशासन राज’ सुरू आहे. या काळात शहराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे विकासाची पूर्णपणे वाताहत झाली असून, नागरिक अनेक समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, शहराला पुन्हा विकासाने पूर्वपदावर आणण्यासाठी आणि पाचगणीला त्याचे ‘गतवैभव’ प्राप्त करून देण्यासाठी सौ. लक्ष्मी कहऱ्हाडकर यांनी नागरिकांकडे अत्यंत भावनिक साद घातली आहे.
“आगामी काळात पुन्हा शहराला विकासाचे आयडॉल बनवण्यासाठी, आम्हाला व उमेदवारांना नगरपालिकेत निवडून द्या असे कळकळीचे आवाहन त्या मतदारांना करीत आहेत.

