पाचगणीच्या शाश्वत विकासासाठी उमेदवारी! – राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांचा निर्धार ‘पर्यटन स्थळाचा दिखावा नव्हे, तर सर्वसमावेशक विकास’
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत वाढत असतानाच, राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांनी आपला प्रचार अधिक प्रभावी केला आहे. ना. मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठीच आपली उमेदवारी असून, प्रचारात पाचगणीकर मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे प्रतिपादन बगाडे यांनी केले.

सिद्धार्थनगर, शाहूनगर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी येथे आज (गुरुवारी/दिनांक) प्रचाराची जोरदार ‘राळ’ उडवून, घराघरात जाऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेताना बगाडे बोलत होते.
‘विकासाचा नवा आयाम’ देण्याचा ध्यास
दिलीपभाऊ बगाडे पुढे म्हणाले की, “ना. मकरंद आबा पाटील यांनी शहराच्या विकासासाठी अनेक संकल्प हाती घेतले आहेत आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी मला संधीची आवश्यकता आहे.”
“हे सर्व संकल्प पूर्ण करून पाचगणीला विकासाचा नवा आयाम देण्याचा आपण ध्यास घेतला आहे,” असे सांगत त्यांनी पाचगणीकरांना भावनिक आवाहन केले. यासाठी सर्वांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सत्तेत पाठवावे. “तुमचे अमूल्य मतच परिवर्तन घडवून विकसनशील पाचगणी घडवणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

