आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले! प्रा. वसंत हंकारे यांच्या ‘न समजलेले आई-बाप’ व्याख्यानाला पाचगणीत उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पालक आणि मुलांमधील संवादाचा अभाव, गैरसमज आणि भावनिक दुरावा दूर करून नात्यांमधील जिव्हाळा वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित प्रख्यात व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या ‘न समजलेले आई-बाप’ या विषयावरील व्याख्यानाला पाचगणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आई-वडिलांच्या त्यागाची, कष्टांची आणि मुलांच्या भविष्यासाठी ते घेत असलेल्या मेहनतीची जाणीव करून देणाऱ्या या व्याख्यानाने अनेक विद्यार्थी आणि पालक भावूक झाले.

पाचगणी : येथील कै.भाऊसाहेब क्रीडांगणावर उपस्थित जनसमुदायास आपल्या व्याख्यानाने मंत्रमुग्ध करताना प्रा. वसंत हंकारे..(फोटो)

पाचगणी येथील कै. भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर पाचगणी पोलीस ठाणे, यांच्या माध्यमातून या  समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास  पाचगणी नगरपरिषद, रोटरी क्लब आणि सह्याद्री पत्रकार संघ यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण क्रीडांगण श्रोत्यांनी भरून गेले होते.

आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात पालक व मुलांमधील संवाद कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणे, त्यांच्यामध्ये संस्कार रुजविणे आणि व्यसनांपासून दूर राहून ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

प्रा. हंकारे यांनी आपल्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आई-वडिलांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला त्याग, सोसलेल्या वेदना आणि घेतलेले कष्ट यांचे वास्तव मांडले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर उपस्थित पालकही भावूक झाले. आपल्या आई-वडिलांना समजून घेण्याची आणि त्यांच्या भावनांचा आदर करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून मिळाली.

वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे आणि पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि व्यसनमुक्तीची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर, परवीन  मेमन,  प्रकाश गोळे, महेश खांडके,  पत्रकार रविकांत बेलोशे, दिलीप पाडळे, महेश ननावरे, सचिन टक्के, प्रमोद रांजणे यांच्यासह नगरसेवक, मान्यवर, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

 

चौकट : व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याचा संकल्प सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. व्यसनांपासून दूर राहून जीवनाचे खरे मूल्य समजून घेणे, आई-वडिलांच्या कष्टांचा आदर करणे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे वाटचाल करणे, हा संदेश या व्याख्यानातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!