प्रतिपंढरपूर करहर आषाढी एकादशी आढावा बैठकीत मंत्री शिवेंद्रराजेंच्या सर्व विभागांना मार्गदर्शक सूचना; भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, चार अतिरिक्त एसटी बसची सुविधा
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या करहर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.

करहर येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, सभापती सौरभ बाबा शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, समाधान पोफळे, सुहास गिरी, मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक, महसूल कर्मचारी, पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत यात्रा काळातील वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात्रेदरम्यान चोरट्यांचा वावर रोखण्यासाठी संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार असून महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मेढा आगाराच्या वतीने भाविकांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन चार अतिरिक्त एसटी बस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पाचवड–करहर मार्गावर दोन आणि पाचगणी–करहर मार्गावर दोन बस धावणार आहेत.
प्रतिपंढरपूर करहर येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ होणार आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ तसेच रात्री ९ ते ११ या वेळेत नामांकित कीर्तनकारांची समाजप्रबोधनपर कीर्तने व हरिजागर आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद सदस्य ह.भ.प. जयश्री गिरी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

