प्रतिकूलतेवर मात करत विक्रम पाडळे यांची एमपीएससीत ४२ वी रँक; कर सहाय्यक पदावर यश
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील रामवाडी येथील विक्रम दत्तात्रय पाडळे या जिद्दी युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत ४२ वी रँक मिळवून कर सहाय्यक पद पटकावले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले असून, रामवाडीच्या नावात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोचला आहे.

लहानपणापासूनच अभ्यासू आणि हुशार असलेल्या विक्रमने आपल्या शालेय जीवनातच गुणवत्ता सिद्ध केली होती. इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत त्याने आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली होती. त्यानंतर त्याने इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण सातारा येथील सयाजी विद्यालयात पूर्ण केले. पुढे यशवंतराव चव्हाण (वायसी) महाविद्यालयातून बी.एससी. पदवी संपादन केली.
एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी बहुतेक विद्यार्थी मार्गदर्शन वर्गांचा आधार घेतात; मात्र विक्रमने कोणतेही खासगी क्लास न लावता केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर यश मिळवले. उपलब्ध पुस्तकांचा योग्य वापर, नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच त्याने हे यश मिळवले आहे.
त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रामवाडीतील ग्रामस्थांकडून तसेच विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे. विक्रम पाडळे यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, हे त्याने दाखवून दिले आहे.

