सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात पाचगणी बंदचा निर्णय; रविवारी पर्यटनस्थळ पूर्ण दिवस बंद

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :सुरूर–पोलादपूर मार्गाच्या धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाने सुरू असलेल्या कामाविरोधात पाचगणीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याच निषेधार्थ रविवारी (८ मार्च) संपूर्ण दिवसभर पाचगणी पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. पाचगणी–महाबळेश्वर मार्ग चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

पाचगणी : येथील पाचगणी क्लबमध्ये सुरूर – पोलादपूर रस्त्याच्या प्रशासनाविरोधात समस्थ पाचगणीकर एकत्र

या संदर्भात आज सकाळी ११ वाजता पाचगणी क्लब येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा, वाढलेली धूळ आणि सततच्या अडथळ्यांमुळे पर्यटक पाचगणी-महाबळेश्वरकडे पाठ फिरवत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. परिणामी पर्यटन हंगामातच स्थानिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून त्याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अनेकांना धुळीमुळे श्वसनाचे त्रास व एलर्जीच्या समस्या उद्भवत आहेत. याशिवाय रस्त्यालगतची वृक्षवेली प्रदूषित होत असून शेतीवरही परिणाम जाणवत आहे. विशेषतः परिसरातील स्ट्रॉबेरी शेतीला धोका निर्माण झाल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) सुरूर–पोलादपूर मार्गाचे काम सुरू आहे. मात्र संबंधित अधिकारी पुणे व मुंबई येथे असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर येथेही काल ग्रामसभेत सर्वानुमते रविवारी महाबळेश्वर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन्ही प्रमुख पर्यटनस्थळे दिवसभरासाठी बंद राहणार आहेत.

या बंदकडे रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात बेमुदत बंद आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. शासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस जिल्हा बँकेचे  संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, श्री. घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, पालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, नगरसेवक नरेंद्र बिरामणे, प्रसाद कारंजकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहूल पुरोहित यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष, सर्व पक्षीय पदाधिकारी, शहर व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अंकुश मालुसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!