करहर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २१५ जणांची तपासणी, ९५ मोतीबिंदू रुग्ण निदान; सौरभ ऋषिकांत शिंदे फाऊंडेशनचा उपक्रम.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील करहर येथे सौरभ ऋषिकांत शिंदे फाउंडेशन आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २१५ जणांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला, त्यापैकी ९५ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले.

करहर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची सखोल तपासणी केली. तपासणीनंतर ९५ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला. त्यापैकी २० रुग्णांना तत्काळ शस्त्रक्रियेसाठी खास रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला रवाना करण्यात आले, तर उर्वरित ७५ रुग्णांना टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाणार असून, जाण्या-येण्याची तसेच शस्त्रक्रियेनंतर घरी सोडण्याची व्यवस्था फाउंडेशनमार्फत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिंदेसेना सातारा उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, तालुका प्रमुख समीर गोळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख नितीन गोळे, उपतालुकाप्रमुख रवि पार्टे, मनसे तालुका प्रमुख अविनाश दुर्गावळे, तसेच प्रकाश गोळे, उमेश दुर्गावळे, के. डी. पवार, प्रतीक वारागडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागात नेत्ररोगांचे प्रमाण वाढत असताना अशा मोफत शिबिरांमुळे गरजू नागरिकांना वेळेवर निदान व उपचाराची संधी मिळत असल्याने करहर परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्यसेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे.

