पाचगणीत परप्रांतीय कामगारांच्या पोलीस पडताळणीची मागणी झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी शहरात वाढत्या परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनिवार्य पोलीस पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, जिल्हा सातारा यांच्या वतीने पाचगणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाचगणी येथे बांधकाम, हॉटेल व्यवसाय, शाळा, लॉजिंग- बोर्डिंग, माळीकाम तसेच विविध पर्यटनसंबंधित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत अशा कामगारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून त्यामध्ये महिला, बालकामगार तसेच वयोवृद्धांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे.
संस्थांच्या मते, अनेक परप्रांतीय ठेकेदारांकडून कामासाठी आणलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती पाचगणी पोलीस स्टेशन किंवा संबंधित गावातील पोलीस पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केली जात नाही. त्यामुळे कायमचा पत्ता, सध्याचा निवास पत्ता, संपर्क क्रमांक, भाडेकरार, कामाचा प्रकार आदी महत्त्वाची माहिती अधिकृत नोंदीत नसते. ही माहिती कायदेशीरदृष्ट्या नोंदविणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, भविष्यात संबंधित ठेकेदार किंवा कामगारांकडून कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी निश्चित करता यावी यासाठी पोलीस पडताळणी अत्यावश्यक आहे. जर कामगारांची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आली, तर संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
शहरातील शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्य राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस पडताळणी ही काळाची गरज असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष अभिजीत (सनी) ननावरे, नितीन वन्ने, ऋषिकेशजी वायदंडे, संजय वन्ने, वैजनाथ प्रभाळे, सुमित प्रभाळे, शुभम ननावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

