महाबळेश्वर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला : सेंट झेवियर्स हायस्कूलला SQAAF अंतर्गत A+ मानांकन

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात महाबळेश्वर तालुक्यातून केवळ सेंट झेवियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (ICSE व SSC) या शाळेनेच A+ मानांकन पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील हजारो शाळांपैकी फक्त ४२९ शाळांना A+ दर्जा प्राप्त झाला असून, त्यात महाबळेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व सेंट झेवियर्सने केल्याने तालुक्याचा शैक्षणिक मान अधिकच उंचावला आहे.

राज्यस्तरावर अत्यंत कठोर आणि बहुआयामी निकषांवर हे मूल्यांकन पार पडले. शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनातील नावीन्यपूर्ण पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, प्रभावी शालेय व्यवस्थापन, सुरक्षित व सुसज्ज पायाभूत सुविधा तसेच सातत्यपूर्ण गुणवत्तावाढ या सर्व घटकांचा सखोल आढावा घेऊन गुणांकन करण्यात आले. या प्रत्येक निकषात उल्लेखनीय कामगिरी करत सेंट झेवियर्स संस्थेने उत्कृष्टतेचा उच्चांक गाठला आहे.

विशेष बाब म्हणजे सेंट झेवियर्स हायस्कूलच्या ICSE व SSC या दोन्ही विभागांनी समान दर्जाची गुणवत्ता सिद्ध करत A+ मानांकन मिळविले आहे. हे यश केवळ शैक्षणिक निकालापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक मूल्यांची जपणूक, शिस्तबद्ध वातावरण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव प्रगती यांचाही गौरव करणारे ठरले आहे.

संस्थेचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समर्पित शिक्षकवृंद, कर्तव्यनिष्ठ कर्मचारी, परिश्रमी विद्यार्थी आणि विश्वासू पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे दैदिप्यमान फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. संस्थेचे संचालक माननीय फादर टॉमी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले.

शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून सेंट झेवियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे. हे यश तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रेरणादायी प्रतीक ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!