बदलत्या शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे — ह.भ.प. संतोष महाराज भादिर्गे, यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बदलत्या शैक्षणिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजेनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. दहावीपर्यंत शिक्षकांचा धाक आणि मार्गदर्शन मिळते; मात्र त्यानंतर मुक्त शिक्षण प्रणालीत स्वतःच्या जिद्दी, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जावे लागते. त्यामुळे आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज भान्दिर्गे यांनी केले.

तालुका जावळी येथील न्यू इंग्लिश स्कूल, खर्शी–बारामुरे या शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर उद्योजक युवराज पार्टे, ज्येष्ठ समाजसेवक मोहन देशपांडे, पत्रकार दिलीप पाडळे, शंकर गावडे, दिलीप यादव, संजय राजपुरे, प्रमोद कुंभार व दत्तात्रय गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी युवराज पार्टे, दिलीप यादव, शंकर गावडे आणि प्रमोद कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात मेहनत, सातत्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच युवराज पार्टे व सुखांत गावडे यांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरव सर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. सौ. साळुंखे मॅडम यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, जिद्द आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर यश संपादन करण्याचा सल्ला दिला. श्री. जमादार सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन तांबारे मामा यांनी केले.

