भिलार गटात ‘घड्याळा’ची वेळ सुरू – विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय निश्चित”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटातील गटांतर्गत गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हाचा प्रचार सध्या जोमात सुरू असून, “कुणाची वेळ कुठे हवी हे मतदारांनी ठरवले आहे आणि विकासासाठी फक्त राष्ट्रवादी हाच पर्याय आहे,” असा ठाम विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जावळी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांनी व्यक्त केला आहे.

भिलार गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार वंदना भिलारे यांच्या प्रचारार्थ आयोजित विविध बैठका, कोपरा सभा आणि मतदार संवाद कार्यक्रमांत राजपुरे बोलत होते. यावेळी त्यांनी भिलार गटातील सर्व गणांमध्ये राष्ट्रवादीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येत्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असल्याचा ठाम दावा केला.
राजपुरे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य शेतकरी, कामगार, महिला व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. भिलार गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी राष्ट्रवादीने सातत्याने निधी उपलब्ध करून विकासाची दिशा ठरवली आहे. त्यामुळे येथील मतदारांनी कोणाच्या भाषणाला नव्हे तर कामाच्या जोरावर मतदान करण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भिलार गणातील उमेदवार वंदना भिलारे या स्थानिक समस्यांची जाण असलेल्या, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणाऱ्या उमेदवार असून, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन राजपुरे यांनी केले. “घड्याळ हे केवळ चिन्ह नसून, विकासाचा वेळ मोजणारे प्रतीक आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भिलार गटातून राष्ट्रवादीच विजयी होणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गटागटांतून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भिलार गटात राष्ट्रवादीची आघाडी स्पष्ट दिसून येत आहे. आगामी निकाल राष्ट्रवादीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

