भिलार गणात भाजपची पकड मजबूत; सौ. सुप्रिया भिलारे प्रचारात आघाडीवर

Spread the love

पाचगणी : सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या भिलार गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गणातील प्रत्येक गावात त्यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराला चांगलीच धार चढली आहे.

गेल्या पाच वर्षांत भाजपने भिलार गट व भिलार गणामध्ये संघटनात्मक पातळीवर भक्कम बांधणी केली आहे. बूथनिहाय बूथ प्रमुखांची प्रभावी रचना, गावागावात सक्रिय कार्यकर्ते आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याची रणनीती यामुळे भाजपचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्याचाच सकारात्मक परिणाम सध्या निवडणूक प्रचारात स्पष्टपणे जाणवत आहे.

उमेदवार सौ. सुप्रिया भिलारे यांनी प्रचारादरम्यान सर्व गावांत प्रत्यक्ष भेटी, संवाद आणि जनतेच्या समस्या समजून घेण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे गणातील महिलावर्गातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, ‘लाडक्या बहिणी’ भाजपच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. महिला मतदारांचा वाढता विश्वास हा त्यांच्या प्रचारातील मोठा आधार ठरत आहे.

भिलार गणामध्ये भाजपच्या विकासकामांचा आलेख, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे भाजपची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळेच प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर सुप्रिया भिलारे यांचे पारडे जड होत चालल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

अजून दोन दिवसांचा प्रचार शिल्लक असून, या कालावधीत प्रचाराची तीव्रता आणखी वाढणार आहे. भाजपची आखलेली निवडणूक रणनीती, संघटनशक्ती आणि मतदारांशी असलेली जवळीक याचा थेट फायदा सुप्रिया भिलारे यांना होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!