भिलार गण निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; सुप्रिया भिलारे ठरतात केंद्रबिंदू
मजबूत संघटन, नेत्यांची फळी आणि कार्यकर्त्यांची ताकद; भाजपचा विजय निश्चित..?
गिरीस्तान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गण सध्या निवडणूक रणधुमाळीमुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय जनता पक्षाने या गणात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी महाबळेश्वर तालुक्याकडे जातीने लक्ष दिले असून, मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने यावेळी चाणाक्ष व संघटनक्षम नेतृत्वाला संधी दिली आहे. भाजपचे महाबळेश्वर तालुका प्रमुख अनिल भिलारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत भिलारे यांच्या धर्मपत्नी सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले असून, त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिलार गणात गेल्या पाच वर्षांपासून भाजपचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. बूथ पातळीवर संघटन मजबूत करण्यात आले असून कार्यकर्त्यांचा थेट जनतेशी संपर्क वाढवण्यात आला आहे. याच संघटनात्मक बांधणीचा फायदा आता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत दिसून येत आहे. त्यामुळेच ही निवडणूक भाजपसाठी तुलनेने सोपी ठरेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर सुप्रिया भिलारे यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.
या प्रचारयंत्रणेत माजी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांचा अनुभव, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले किशनशेठ भिलारे यांचा जनसंपर्क, तसेच युवा नेते नितीनभाई भिलारे यांचे संघटन कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यांच्यासोबत मोहन गोळे, चेतन पार्टे, मधुकर गोळे, विनायक भिलारे, नारायण देवघरे, संतोष गोळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. भाजपच्या विकासकामांची माहिती देत मतदारांशी थेट संवाद साधला जात असून सुप्रिया भिलारे यांना बहुमत मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते अक्षरशः जीवाचे रान करीत आहेत.
एकूणच मजबूत संघटन, अनुभवी नेते आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या जोरावर भिलार गणात भाजपचा विजय निश्चित मानला जात असून निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे.

