“बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ फेस्टिव्हलचे आयोजन; २३ ते २५ जानेवारीदरम्यान कला, क्रीडा व शिक्षणाचा संगम”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : कृतियुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या पाचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ या भव्य शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २३, २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या मैदानावर पार पडणार असून, या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अदिती एज्युकेश संचलित बिलीमोरिया शाळेच्या संचालिका अदिती गोराडिया यांनी केलं आहे.

विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि विविध कौशल्यांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचे संकल्पना स्पष्टीकरण, अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण आणि सर्वांगीण विकासावर भर देणारी ही शाळा भारतातील पहिल्या दहा उत्कृष्ट निवासी शाळांमध्ये गणली जाते, ही बाब पाचगणीसाठी अभिमानास्पद आहे.
शुक्रवार (दि. २३) रोजी बिलिमोरिया हायस्कूलच्या मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत मान्यवर कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे विविध सादरीकरण, क्रीडा स्पर्धा तसेच शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शाळेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या ‘आरंभ’ महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील नामांकित विद्यापीठांचा सहभाग. या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, उच्च शिक्षणाच्या संधी आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

