भिलार गट–गणात राष्ट्रवादीची वज्रमूठ; प्रचाराच्या रणधुमाळीत केळगणे–भिलारे–चोरमले यांची विजयी मुसंडी
राजपुरे–भिलारे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य; विजयाचा गुलाल उधळण्याचीच प्रतीक्षा
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील सत्तेचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या भिलार गट व गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या सक्षम नेतृत्वात आणि जिल्हा नियोजन समितीचे समन्वयक प्रवीण भिलारे यांच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदेच्या भिलार गटातील उमेदवार संजय केळगणे, भिलार गणातील महिला उमेदवार वंदना भिलारे तसेच मेट–गुताड गणातील महिला उमेदवार शकुंतला चोरमले यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारत विजय निश्चित केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व विभागातील भिलार गट हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता प्रस्थापित करत संपूर्ण तालुक्यावर भिलारचे वर्चस्व निर्माण केले होते. त्यांच्या पश्चात तालुक्याच्या राजकारणाची धुरा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे समर्थपणे सांभाळत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जात आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी गावोगावी, वाडीवस्तीवर आक्रमक व लोकाभिमुख प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामांचा ठोस लेखाजोखा, अनुभवसंपन्न नेतृत्व आणि संघटनेची मजबूत फळी यामुळे विरोधक पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहेत. भिलार गट व गणामध्ये वर्चस्वाची लढाई दिसत असली तरी राष्ट्रवादीच्या प्रचारातील एकसंधता, जोश आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता बाजी राष्ट्रवादीनेच मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूणच भिलार गट–गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावाती प्रचार, अनुभवी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची फौज यामुळे तिन्ही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून, आता केवळ विजयाचा गुलाल अंगावर पडण्याचीच औपचारिकता बाकी राहिली आहे.

