म्हसवे गटात प्रचाराचा जोर वाढला; शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली संदीप पवार–विठ्ठल गोळे,शिल्पा शिंदे आघाडीवर
म्हसवे गटात प्रचाराचा धुरळा; पवार–गोळे,शिंदे, यांनी रण पेटवले
घरभेटींना उस्फूर्त प्रतिसाद, विरोधकांची चिंता वाढली
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगली असून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. या गटातून शिंदेसेनेचे उमेदवार संदीप पवार तर खर्शी–बारामूरे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल गोळे, म्हसवें गणातील शिल्पा शिंदे यांनी प्रचाराचा वेग वाढवत संपूर्ण गट पिंजून काढला आहे.

उमेदवार संदीप पवार व विठ्ठल गोळे, शिल्पा शिंदे, यांनी गावभेटी, घरभेटी, बैठका आणि थेट मतदारांशी संवाद साधत प्रचाराची धार अधिक तीव्र केली आहे. प्रत्येक गावात होत असलेल्या घरभेटींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकास, प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक गरजांबाबत मतदारांकडून सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवारांचा विजय आता दृष्टीक्षेपात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
या प्रचार मोहिमेत जावळी तालुक्यातील विविध मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. माथाडी कामगारांचे नेते ऋषीभाई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा युवा अध्यक्ष तेजस शिंदे, माथाडी कामगार नेते राहुल पवार, उद्धव सेनेचे तालुका प्रमुख नितीन गोळे, शिंदेसेनेचे तालुका प्रमुख समीर गोळे यांच्यासह मनसे तालुका प्रमुख अविनाश दुर्गावळे, उमेश दुर्गावळे, प्रवीण गुजर, प्रकाश गोळे, राहुल पवार, सुशील गोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर आहेत.
गावोगावी होत असलेल्या सभांमध्ये महाविकास आघाडीच्या विकासात्मक धोरणांचा आढावा घेतला जात असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित केली जात आहे. शेतकरी, युवक, महिला आणि कामगार वर्गाकडून उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता म्हसवे गटातील निवडणूक अधिकच चुरशीची बनली असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण तापल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

