लोकशाहीला साथ, विकासाला मत’चा नारा देत सुशील गोळेंचा उमेदवारी अर्ज दाखल; खर्शी–बारामुरे गणात उत्साहाचे वातावरण
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, युवकांच्या प्रश्नांची अचूक जाण आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क असलेले धडाडीचे युवा नेते श्री. सुशील विष्णू गोळे यांनी आज खर्शी–बारामुरे गण पंचायत समिती निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत ‘लोकशाहीला साथ, विकासाला मत’ असा नारा देत परिसर दणाणून सोडला.

सुशील गोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. २०१४ साली त्यांनी अखेगणी येथे शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान, जावळीची स्थापना करून ५०० झाडांची लागवड केली. २०१५ मध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने याच संस्थेच्या माध्यमातून ५५ भाविकांना केवळ १० रुपयांत पंढरपूर दर्शन घडवून आणले. २०१६ साली हिंदू एकता जावळीच्या माध्यमातून एकत्रित शिवजयंती महोत्सवाची सुरुवात करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
२०१८ साली ते महू ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. कोविड लॉकडाऊन काळात प्रशासनाला सहकार्य करत गरजूंसाठी मदतीचे कार्य केले. २०२२ साली आमदार शशिकांत शिंदे पर्यटन संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची बिनविरोध निवड झाली. प्रकल्पग्रस्त तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महू धरण येथे उपोषण, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांसाठी मेळावे घेण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.
जावळी तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलने केली, तसेच बोटिंगच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.
तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी उत्तम जनसंपर्क असलेले सुशील गोळे हे विकासाचा ठोस आराखडा घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे खर्शी–बारामुरे गणातील निवडणूक चुरस अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

