माघी गणेश जयंती उत्सवाच्या मुहूर्तावर विठ्ठल गोळेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा; आमदार शशिकांत शिंदेंनी घेतले गणेशाचे दर्शन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार धावपळ सुरू आहे. अशा ऐन निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रुईघर (गणेशपेठ) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याच शुभमुहूर्तावर खर्शी–बारामुरे गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल गोळे यांच्या प्रचाराचा औपचारिक श्रीगणेशा करण्यात आला.

गणेश मंदिरात शशिकांत शिंदे आणि विठ्ठल गोळे यांनी श्रीगणेशाचे मनोभावे दर्शन घेतले उपस्थित नागरिकांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर श्री गोळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यात आली. या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवाराला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास खर्शी–बारामुरे गणाचे उमेदवार विठ्ठल गोळे यांच्यासह गोपाळ बेलोशे, रामदास पार्टे, सचिन गोगावले, शेखर भिलारे, संतोष बेलोशे, अंकुश बेलोशे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधत निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार करण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलताना विठ्ठल गोळे यांनी सांगितले की, जनतेच्या आशीर्वादाने आणि पक्षाच्या पाठबळावर आपण निश्चितच यश मिळवू. माघी गणेश चतुर्थीसारख्या शुभदिनी प्रचाराची सुरुवात झाल्याने विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एकूणच या कार्यक्रमामुळे खर्शी–बारामुरे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला औपचारिक आणि उत्साही सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

