पाचगणीत रस्ते दुरुस्तीला वेग, मूलभूत सुविधांवर नगरपरिषदेचा भर”नवनिर्वाचितांचा लोकाभिमुख पुढाकार
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविका व नगरसेवकांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या-आपल्या प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपरिषद अधिक सक्रिय झाली असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे व श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी एकत्र येत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्राधान्याने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
रस्त्यांसोबतच स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालये, स्ट्रीट लाइट्स, गटार साफसफाई अशा विविध नागरी सुविधांकडेही नगरपरिषदेने लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक प्रभागातील तक्रारी स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावल्या जात असून, नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर त्वरित उपाय करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवीन नगरसेवकांनी पदभार स्वीकारताना नागरिकाभिमुख, पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. “पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले जाईल. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मूलभूत सुविधांमध्ये ठोस सुधारणा घडवून आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी सांगितले.
एकूणच, नगरपरिषदेने हाती घेतलेल्या या तत्पर कार्यपद्धतीमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात पाचगणीतील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय व सकारात्मक बदल दिसून येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

