वालुथ गावच्या दोन सुपुत्रांचा अभिमानास्पद गौरव; सैन्यदलातील लेफ्टनंट पदी निवड व पोलीस सेवेत पदोन्नती बद्दल भव्य सत्कार

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : वालुथ गावचे सुपुत्र साहील मानसिंग पोफळे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल तसेच शशीकांत कृष्णा गोळे (आण्णा) यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल वालुथ ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ मंदिरात प्रांगणात भव्य सत्कार नुकताच जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना राजपुरे म्हणाले की,देशसेवा आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या या दोन्ही युवकांनी वालुथ गावाचा नावलौकिक वाढविला आहे.
या सत्कार समारंभास पाचगणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र पारटे, मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ प्रतापराव गोळे, यशराज अकॅडमी कात्रज पुणे तेजस पाटील, सोमशिंग सर, जावळी बँक संचालक योगेश गोळे, जावळी बँक कर्मचारी संचालक अशोक चव्हाण, निवृत पोलिस निरीक्षक चंद्रकांत पोफळे, जावळी महाबळेश्वर बाजारसमिती संचालक बुवासाहेब पिसाळ, डॉ. सतीश रहाटे, शिवसेना तालुका अध्यक्ष नितीन गोळे, रवि पार्टे, समस्त वालुथकर उपस्थित होते.

प्रथमतः कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलमाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते साहील पोफळे आणि शशीकांत गोळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून दोन्ही अधिकाऱ्यांच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीचे कौतुक केले. “ग्रामीण भागातून येऊन देशाच्या संरक्षणासाठी व कायदा-सुव्यवस्थेसाठी कार्य करणे ही अभिमानाची बाब असून, हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

या वेळी साहील पोफळे यांनी बोलताना आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक आणि ग्रामस्थांना दिले. देशसेवा करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी भविष्यातही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याचा संकल्प व्यक्त केला. तर शशीकांत गोळे (आण्णा) यांनी पोलीस सेवेतून समाजातील सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या वतीने दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार समारंभ वालुथ गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, युवकांना स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवेकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.

ग्रामस्थ, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!